येत्या २० तारखेच्या आत रब्बी धान व मका खरेदी केन्द्र सुरु करा, अन्यथा तीव्र आंदोलन : आ. गजबे

प्रतिनिधि/अंकुश पुरी

देसाईगंज : खरीप हंगाम 2020-21 च्या धानाची अद्यापही उचल करण्यात न आल्याचे सबब पुढे करून रब्बी धान खरेदी केन्द्र सुरु करण्यात शासकीय स्तरावरुन चालढकल करण्यात येत आहे.यामुळे रब्बी हंगामातील धान उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता येत्या 20 तारखेच्या आत रब्बी धान व मका खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावे, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन दिला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पञकात त्यांनी म्हटले आहे की खरीप हंगाम 2020-21 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या खरीप हंगामातील धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे उपलब्ध गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान शिल्लक असून रब्बी हंगामातील धान खरेदीचा यथायक्ष गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याचा गैरफायदा घेत खाजगी व्यापारी हमीभावापेक्षा कितीतरी कमी किमतीत धान खरेदी करीत असल्याने याचा शेतक-यांना जबर फटका बसत आहे.
खरीप हंगामाच्या मानाने रब्बी हंगामात धानाचे अधिक उत्पादन येत असल्याने खरेदीची मर्यादा 40 ते 45 क्विंटल प्रती हेक्टर व मका 75 ते 80 प्रती हेक्टरी वाढवून देण्याचीही मागणी त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन केली आहे.खरीप हंगामातील धानाची अद्यापही उचल करण्यात न आल्याने गोडाऊन फुल्ल आहेत. अशात अद्यापही शासकीय धान व मका खरेदी केन्द्र सुरु करण्यात न आल्याने शेतक-यांना स्थानिक व्यापा-यांना कवळीमोलाने धान विकणे भाग पडु लागले आहे.रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच करण्यात येत असले तरी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाचीच उचल करण्यात न आल्याने रब्बी खरेदीचा धान ठेवण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.अशातच पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने शेतक-यांना दुहेरी संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासकीय स्तरावरुन जाहिर केल्याप्रमाणे खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाचे प्रती क्विंटल 700 रुपये प्रमाणे बोनसही देण्यात आला नाही.तद्वतच नियमित पिक कर्जाचा भरणा करणा-या शेतक-यांना अद्यापही सानुग्राह अनुदान देण्यात आले नाही.यामुळे कोरोनाचा दुहेरी संकट झेलत असलेल्या शेतक-यांसह मजुरांवर अनेक संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी घोषणाबाजी न करता जाहीर केलेल्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तथापि येत्या 20 तारखेच्या आत रब्बी धान व मका खरेदी केन्द्र सुरु करण्यात न आल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातुन दिला आहे.