मदतीला धावणारे टापरे दाम्पत्य भोजन व्यवस्थेत सहभागी

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

गडचिरोली– जिल्हाच नव्हे तर संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीत आहे. कोरोनाची दररोजची आकडेवारी लक्षात घेऊन अनेक जण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत घरी सुरक्षीत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच रुग्णालयात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीय आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन रुग्णांच्या मदतीला हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला. चक्क जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांची आभाळ लक्षात घेऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भोजन वितरण करण्याचा निर्णय घेतला. या भोजन वितरण कार्यक्रमाला 21 दिवस पूर्ण झाले. तरीही युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व त्यांच्या चमूने कोणत्याही रुग्णाचे नातेवाईक उपाशी राहू नये, याकरिता प्रयत्न करीत आहेत. त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी नेहमी मदतीसाठी धावून जाणारे म्हणून ओळख असलेले टापरे दाम्पत्य ( मदन व अनिता टापरे) युवक काँग्रेसच्या भोजन वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतिश विधाते, रजनीकांत मोटघरेगोंडवाना सैनिकी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे, वीज वितरण कंपनीचे सेवा निवृत्त अभियंता सुरेश लडके व त्यांची कन्या संपदा लडके ,गौरव येणप्रेद्दीवार,रवी गराडे,समीर ताजने,सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.