राज्यात आजपासून चार दिवस पाऊस कोकण आणि घाट विभागांत अतिवृष्टीचा इशारा

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.या स्थितीचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात १४ मेपासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मोसमी वाऱ्यांच्या भारतातील आगनमापूर्वी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. गुरुवारी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. १५ आणि १६ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तमिळनाडू आदी भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार चक्रीवादळ १८ मे रोजी पश्चिम उत्तर दिशेने गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. १४ ते १७ या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होईल. १५ आणि १६ मे रोजी कोकणात किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी होणार आहे.