स्‍व. गजानन गोरंटीवार स्मृती प्रित्यर्थ डिजीटल लायब्ररीचे 11 मे रोजी उद्घाटन डिजीटल लायब्ररीच्‍या माध्‍यमातुन होणार सेवाव्रतीचे स्‍मरण

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

पोंभुर्णा नगर पंचायतीचे प्रथम नगराध्‍यक्ष तथा पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार यांचे नुकतेच किडनीच्‍या आजाराने निधन झाले. त्‍यांच्‍या तेरवी निमीत्‍त त्‍यांना आदरांजली म्‍हणून पोंभुर्णा येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात स्‍व. गजानन गोरंटीवार स्मृती डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे. या डिजीटल लायब्ररीच्‍या माध्‍यमातुन सेवाव्रतीचे स्‍मरण पोंभुर्णा वासीयांना कायम होणार आहे.

दिनांक ११ मे रोजी स्‍व. गजानन गोरंटीवार यांचे सुपुत्र दर्शन गोरंटीवार यांच्‍या हस्‍ते या डिजीटल लायब्ररीचे उद्घाटन संपन्‍न होणार आहे. पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या स्‍थापनेपासुन पोंभुर्णा शहरात विविध विकासकामे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पुर्णत्‍वास आली. या विकासकामांचा पाठपुरावा स्‍व. गजानन गोरंटीवार यांनी सातत्‍याने केला.

नागरिकांचे प्रश्‍न, समस्‍या सोडविण्‍यासाठी तत्‍परतेने धावून जाणारा भाजपाचा निष्‍ठावान कार्यकर्ता त्‍यांच्‍या निधनाने काळाच्‍या पडदयाआड गेला. पोंभुर्णा शहरात डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभी राहावी यासाठी सुध्‍दा त्‍यांनी सतत पाठपुरावा केला. या वाचनालयात आता अठरा संगणक उपलब्‍ध करण्‍यात आले असुन त्‍यामाध्‍यमातुन स्‍व. गजानन गोरंटीवार यांच्‍या स्मृती जपत त्‍यांच्‍या नावाने डिजीटल लायब्ररी सुरू करण्‍यात येणार आहे.

स्‍व. गजानन गोरंटीवार स्मृती डिजीटल लायब्ररीच्‍या उद्घाटन प्रसंगी जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, पंचायत समिती सभापती अलका आत्राम, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, श्‍वेता वन, रजिया कुरेशी, ईश्‍वर नैताम, विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींच्‍या उपस्‍थीती राहणार आहे.