अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्यासाठी खावटी अनुदान योजना पुनश्च सुरू 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तू अनुदान स्वरूपात मिळणार लाभ

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. खाअयो -2020 /प्र.क्र.37/का.3 मंत्रालय, मुंबई दि. 9 सप्टेंबर 2020 अन्वये राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना 1 वर्षासाठी (सन 2020-21) सुरु करण्यास व या योजनेचा लाभ 50 टक्के रोख व 50 टक्के वस्तु अनुदान स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने, या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभिड व ब्रम्हपुरी या पाच तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी खावटी अनुदान योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत आवेदन केलेले नाही.त्यांनी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या जवळच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुलांचे,मुलींचे वसतिगृह येथे प्रत्यक्ष जावुन विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावे. व परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासोबत तिथेच जमा करावे. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी खावटी अनुदान योजनेअंतर्गत आवेदन केलेले आहे अशा लाभार्थ्यांनी पुनश्च: आवेदन करण्याची आवश्यकता नाही.

सदर कुटुंबामध्ये प्रामुख्याने पारधी जमात, आदिम जमात, दि.1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीतील मनरेगावर काम करणारी कुटुंबे , परितक्त्या, घटस्पोटीत महिला, विधवा, भुमीहीन शेतमजुर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब इत्यादी कुटुंबांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.

सदर योजना ही 100 टक्के अनुदानावर असल्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही स्तरावर कुणाशीही आर्थिक व्यवहार करु नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे प्रकल्प अधिकारी, के.ई. बावनकर यांनी केले आहे.