उपविभागीय अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेत संघर्षाची ठिणगी

@ महसूल कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

@ कर्मचाऱ्यावर पाेलिसात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

बल्लारपूर येथे उपविभागीय कार्यालयात कार्यरत उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी गाेंडपिपरी तहसील कार्यालयात कार्यरत एका कर्मचाऱ्यावर पाेलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी व जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेत संघर्षाची ठिणगी उडाली आहे. उपविभागीय अधिकारी यांचे वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेतला असून उपविभागीय अधिकारी व जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या संघर्षामुळे काेराेना टाळेबंदी काळात कामे प्रभावित हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून संजीवकुमार डव्हळे हे सप्टेंबर २०१९ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या कडे गाेंडपिपरी उपविभागीय कार्यालयाचा देखील पदभार साेपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात महसूल प्रशासनातील कामाचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. उपविभागीय अधिकारी व महसूल कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे. महसूल कर्मचारी यांचेशी असभ्य वर्तन त्यांच्या कार्य शैलीतून वारंवार दिसून येत असल्याचा आरोप जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी केला आहे.
बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी संजीवकुमार डव्हळे बेशिस्तीचा ठपका ठेवून सुनील चांदेवार या महसूल कर्मचाऱ्यावर पाेलिसात गुन्हा दाखल केला. यामुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन सादर करून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. महसूल कर्मचारी सुनील चांदेवार यांना अपमानास्पद वागणूक देऊन उलट त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारे कृत्य उपविभागीय अधिकारी संजीवकुमार डव्हळे यांनी केले आहे. यामुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. वर्षभरा पासून काेराेना संक्रमण काळ सुरू आहे. यावर्षी काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकाेपाने सारेच संकटात सापडले आहेत. आरोग्य विभाग, महसूल विभाग व पाेलिस प्रशासन समन्वयातून काेराेना संक्रमण काळात जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. यामुळे कुटुंबाची घालमेल हाेत आहे. याकडे दुर्लक्ष करून महसूल प्रशासनातील कर्मचारी सेवा देत असताना अधिकारी पदाचा वापर करून एखाद्या कर्मचाऱ्यावर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रकार महसूल कर्मचारी वर्गाचे मनाेबल खच्चीकरण केले जात आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा आरोप जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी संजीवकुमार डव्हळे यांना निलंबित करावे, अन्यथा साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनातून दिला आहे. यावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनावर पडदा टाकणार काय, याकडे जिल्हा भरातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.