बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)
कोविड रूग्णांवर विहित कार्यपद्धतीनुसार उपचार न केल्यास तसेच चंद्रपूर कोविड-19 पेशन्ट मॅनेजमेंट पोर्टलवर नोंदणी न करता परस्पर रूग्ण दाखल करून घेणाऱ्या कोविड रूग्णालयाचा परवाना नियमानुसार कारवाई करून रद्द करण्यात येईल, असे आदेश आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही व त्यांना हॉस्पिटलसाठी वणवण फिरावे लागत होते त्यामुळे त्यांना प्राथमिकतेनुसार आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळावे, यासाठी चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यात कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयाने रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण त्यांना बेड उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये थेट जाऊन उपचार घेतील. शहरातील सर्व कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील, यामुळे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होणार आहे.