बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अजूनही अत्याधुनिक कोविड रुग्णालयाच्या प्रतीक्षेत :- राजु झोडे

 

*कोरोना काळात अपयशी ठरलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यावा*

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि) 

 

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड सहित रुग्णालय आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर नंतर सर्वात मोठे शहर बल्लारपूर असून सुद्धा या ठिकाणी व्हेंटिलेटर बेडची सोय नाही. बल्लारपूर,मुल पोंभूर्णा या परिसरातील जनतेला चंद्रपूर शिवाय पर्याय नाही. चंद्रपूर या ठिकाणी साधा बेड सुद्धा कोरोना पेशंटला उपलब्ध नाही त्यामुळे कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माजी अर्थमंत्री यांचा हा बल्लारपूर विधानसभा क्षेत्र आहे. सर्वात जास्त निधी या क्षेत्रात खर्च करण्यात आले असे माजी विकास पुरुषाने आपले नावलौकिक मिरवलेले आहे. मानवी हिताचे काम न करता फक्त निर्जीव बांधकामाकडे लक्ष देण्यानेच आज आरोग्याच्या दृष्टीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मागासलेला आहे.या क्षेत्रात कोविड हॉस्पिटल अजूनही निर्माण करण्यात आलेले नाही. करिता कथित विकासपुरुषांनी नैतिकता स्वीकारून तात्काळ आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. कथित विकासपुरुष केंद्राचे गोडवे गाण्यातच व्यस्त आहेत. आंध्र प्रदेश सरकारने व्हेंटिलेटर बेडची मदत केली असताना केंद्राचे नाव घेण्याचा जप सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडी द्वारे मागील वर्षीपासून आरोग्याच्या प्रश्नांना घेऊन या क्षेत्रात मोर्चे-आंदोलने केलेली आहेत. परंतु कथित विकास पुरुषाने याकडे दुर्लक्ष करून बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा याठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड व कोविड हॉस्पिटल तयार करण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहेत.
करिता बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल या ठिकाणी त्वरित कोविड हॉस्पिटल तयार करून त्याठिकाणी ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर व इतर आरोग्य सुविधा तात्काळ पुरविण्यात यावा करिता वंचित बहुजन आघाडी द्वारा आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला. निवेदन देताना राजू झोडे, संपत कोरडे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.