जनसंवादा चे सकारात्मक परिणाम अल्पवयीन मुलीचे लग्न करण्यास मातेचा स्पष्ट नकार.

 

विक्रमगड तालुका प्रतिनिधी//समीर आळशी

पोलीस अधीक्षक पालघर बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जनसंवाद योजनेचे सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत.
विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथील श्रीमती मालती किशोर भाई संघवी विद्यालय येथे विक्रमगड पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी जनसंवाद योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथील महिला अनिता मधुकर चौधरी हिने ” अल्पवयीन मुलीचे लग्न व त्याचे दुष्परिणाम” याबाबत मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपण करत असलेल्या चुकीची जाणीव तिला झाली तिने तिची अल्पवयीन मुलीचे ठरवलेलं लग्न करण्यास ठाम विरोध केला. प्रसंगी लग्न ठरलेल्या मुलाशी वाद घातला व आपली मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय आपण तिचे लग्न करणार नाही. असा ठाम निर्धार केला. सदरचा वाद विक्रमगड पोलीस स्टेशन पर्यंत आला. तेव्हा मलवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक गीते यांनीही मुलाच्या घरच्यांना अल्पवयीन मुलीच्या लग्नाचे दुष्परिणाम सांगून ते करत असलेल्या चुकीची जाणीव करून देऊन समज दिली.
विक्रमगड तालुक्यात प्रत्येक गावात जनसंवाद योजनेचा उपक्रम सुरू असून मलवाडा येथे दिनांक 31 मार्च 2023 रोजी येथील पोलीस पाटील राजेंद्र गोपाळ पाटील यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.