प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने’च्या लाभापासून शेतकरी वंचित संगणकीय प्रणालीच्या दोषाचा २४०० लाभार्थ्यांना फटका

 

#khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#education#political#crime

जोगीसाखरा – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सम्मान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना सुरळीतपणे मिळत असतांना संगणकीय प्रणालीच्या दोषामुळे आरमोरी तालुक्यातील सुमारे २४०० लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. यावर ताबडतोब उपाययोजना करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान योजना अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. यातून शेतकऱ्यांच्या कौटुंबिक खर्चासाठी व शेतीच्या खर्चासाठी थोडा हातभार लागत असतो. वेळोवेळी आलेल्या शासनाच्या निर्देशाचे शेतकरी तंतोतंत पालन करीत असतात.
मागिल वर्षी शासनाच्या निर्देशानुसार जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी केवायसी केली. मात्र हे सर्व करून सुद्धा आरमोरी तालुक्यातील तब्बल २४०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. यासाठी हे संपूर्ण शेतकरी तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. योजनेपासून अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणे सांगण्यात येत असले तरी मुख्य बाब म्हणजे संगणकीय प्रणालीच्या दोषामुळे हे लाभार्थी वंचित असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. मात्र तहसिल कार्यालयाचे कर्मचारी ई केवायसीचा बागुलबुवा पुढे करून टोलवाटोलवी करीत आहेत.
याबाबत अधिक निष्कर्ष काढले असता मिळत्याजुळत्या गावांच्या नावामुळेसुद्धा शेतकरी अपात्र ठरल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील पाठणवाडा व पाथरगोटा या दोन गावातील शेतकऱ्यांची नावे अदलाबदल झाले असून शेतकऱ्यांचे नाव व त्यांच्या गावाचे नाव जुळत नसल्याने शेतकरी अपात्र ठरून लाभापासून वंचित झाले आहेत. हाच प्रकार तालुक्यातील मिळतेजुळते नाव असलेल्या गावांच्या बाबतीत घडल्याने हजारो शेतकरी अपात्र ठरून लाभापासून वंचित आहेत. संगणक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा दोष असून त्यांच्याकडूनच हे दोष निवारण होऊ शकते. मात्र ही बाब गंभिरतेने न घेतल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
शेतकरी सम्मान योजनेस पात्र ठरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा व या योजनेपासून कोणताच शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे निवेदनातून केली आहे.