शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन पिकांची निवड करावी – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

 

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान

शेतकऱ्यांसाटी दोन दिवसीय शेतकरी मेळावा

जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते मेळाव्याचे उद्घाटन

वर्धा, दि. 28 : शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. पारंपारिक पिकांसोबतच इतर जोड व्यवसायांची निवड करून आपल्या पिक पध्दतीत विविधता आणावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र, सेलसुराच्या संयुक्त विद्यमाने “किसान भागिदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत चरखागृह, सेवाग्राम येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी बोलत होत्या.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, सतीश सांगळे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी परमेश्वर घायतिडक, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.जीवन कातोरे, प्रेरणा धुमाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा. या खरीप हंगामापासून फळबाग लागवड पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि रेशीम विकास या क्षेत्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवुन पिकांची निवड करावी, असे सांगितले.
मेळाव्यात मानसिक रोग तज्ञ कमलेश पिसाळकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कातोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गजानन मसाळ, डॉ.सविता पवार, एमसीडीसीचे विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर, कीटक शास्त्रज्ञ डॉ. वझीरे, प्राध्यापक व्ही. पी. गिरी या मान्यवरांनी शून्य मशागत तंत्रज्ञान व सेंद्रिय कापूस, शेतकरी समुपदेशन व मानसिक आरोग्य, सोयाबीन, कापूस, तूर पिकाच्या वाणाची माहिती, खरीप हंगाम पूर्वनियोजन व पीक लागवड तंत्रज्ञान खरीप पूर्व हंगाम मशागतीची कामे व सेंद्रिय खताचे महत्त्व, बी.बी.एफ यंत्र, ट्रॅक्टर देखभाल व दुरुस्ती, रासायनिक खते व खत विषयक परवाने, खरीप पीक निहाय कीड व रोग व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी ज्यांनी नावीन्यपूर्ण शेती करून उत्पादन मिळविले, अशा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यात शेतकऱ्यांसह कृषि निविष्ठा उत्पादक, विक्रेते देखील सहभागी झाले होते.