सुरजागड लोहखनिज प्रकल्पात काम करणाऱ्या १७८१ स्थानिक कामगारांना नियुक्तीपत्र वितरण

 

गडचिरोली: जिल्ह्यात सुरजागड येथे त्रिवेणी कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लोहखनिज प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. याशिवाय कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करणे, स्थानिक नागरिकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, पुरुषांना सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तर महिलांना गाडी, ट्रक, क्रेन, जेसीबी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यासोबतच ब्लॉकचेन पद्धतीने जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाला देखील आजपासून सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत ६५ हजार जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या कसनसूर, हालेवारा, तोडसा, जंबिया येथे उभारण्यात आलेल्या ६८४ विद्यार्थी क्षमतेच्या ४ वसतीगृहांचा लोकार्पण सोहळा देखील आज संपन्न झाला.

याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, आमदार धर्मराव बाबा आत्राम, सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता, त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक बी.प्रभाकरन आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.