पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी नगर पंचायत कार्याल्यापुढे नागरिकांनी केले उपोषण

 

उपोषणा द्वारे नागरिकांनी पाणी समस्येकडे वेधले शासनाचे लक्ष

कारंजा ( घा.) नगर पंचायत ने पाठविलेला १४ कोटीचा वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ताबडतोब मंजूर करून कारंजा शहरातील गंभीर अशी पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवावी या मागणी करीता नागरी समस्या संघर्ष समिती द्वारा नगरपंचायत कार्यालयापुढे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कारंजा नगरपंचायतने ‘सुवर्णजयंती नगरोत्थान’ योजने अंतर्गत सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे १४ कोटीचा वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु मागील अडीच वर्षापासून सदर प्रस्ताव वेगवेगळ्या त्रुटी मध्ये व दप्तर दिरंगाई मध्ये अडकलेला आहे. प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे आता योजनेचे मूल्य २० कोटी पर्यंत वाढल्याचे सांगितल्या जात आहे.
मागील अनेक वर्षापासून तिन्ही ऋतूमध्ये नागरीकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे.परंतु शासन,प्रशासन अथवा कोणत्याही राजकीय नेतृत्वामध्ये या समस्येचे गांभीर्य दिसत नाही. शुद्ध व नियमित पाणी मिळणे हा नागरीकांचा अधिकार आहे.परंतु नागरीकांना मात्र चार,पाच अथवा सहा दिवसाआड पाणी मिळते आहे. अस्तित्वात असलेली योजना जुनी आहे. आता शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे योजना मंजूर होईल कधी आणि नवीन योजनेचे शुद्ध व नियमित पाणी मिळेल कधी ? हा प्रश्नच आहे .
प्रस्ताव ताबडतोब मंजूर करून पाणी समस्या कायम स्वरुपी सोडवावी या करिता नागरी समस्या संघर्ष समिती ने शासनाला वारंवार निवेदने, स्मरणपत्रे, पालकमंत्री यांच्या भेटी,चर्चा,ऑनलाईन सर्व्हे, स्वाक्षरी अभियान असे अनेक मार्ग अवलंबिले. परंतु शासनाला कारंजा मधील पाणी समस्येविषयी अजिबात गांभीर्य दिसत नाही.
त्यामुळे सदर प्रश्ना कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सदस्यानी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते. उपोषणकर्त्यांमध्ये
विभाकरजी ढोले, मधुसुदनजी डोबले
डॉ. रविकांतजी गाडरे, हरीभाऊजी हिंगवे, रमेशरावजी बारंगे, एम. अनिस मुल्ला, संजयरावजी बन्नगरे,उमेशरावजी खपरे,बबनरावजी राउत, ज्योतीताई यावले,अंजलीताई इंगळे, संगिताताई कामडी,सुनिताताई साहू, उमेशभाऊ पाचपोहर,रमाकांत दळवी,पद्माताई ढोले इत्यादी नागरी समितीचे सदस्य व शहरातील नागरिक उपोषणाला बसले होते.
उपोषण मंडपाला माजी जि. परिषद अध्यक्ष सरिता गाखरे,नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी श्री.किशोर साळवे व नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी, वार्ड नंबर १६ चे नगरसेवक व नगरपंचायत मधील विरोधी पक्षीय सर्व नगरसेवक यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. उपोषण मंडपामध्ये असंख्य नागरिकांनी भेटी देऊन पाणी समस्या विषयी प्रतिक्रिया नोंदविल्या.