भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमात आयोजित रक्तदान शिबिर, अभ्यास अभियान व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान आदी कार्यक्रम आज झाले. शिबिरात ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा येथे रक्त्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्याहस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी रक्तदान करुन रक्तदान कार्यक्रमास सुरवात केली.
रक्तदान शिबीरांची सध्या आवश्यकता आहे. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने व्हावेत. गरजु रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा होऊन वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकेल. तरी जास्तीत जास्त प्रमाणात इतरही सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवुन आरोग्य विषयक बाबीकरीता आपले योगदान देऊन आरोग्य यंत्रणांना सहकार्य करावे, असे डॉ. निकीता तौर यांनी सांगितले. त्यांचे सह यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीअल हॉस्पीटल अमरावतीच्या प्राजक्ता गुल्हाने, टेक्नीशियन, हारीस खान, साहेबराव अलमाबादे, सुरज नागपुरे इत्यादींची चमु सदर रक्तदान शिबीरा करीता उपस्थित होती.
सदर शिबीरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीरामध्ये आपला सहभाग नोंदविला. सलग 16 तास अभ्यास अभियान
त्याचप्रमाणे, समाजकल्याण विभाग व बार्टीतर्फे सलग 16 तास वाचन व अभ्यास याचे नियोजन भिमटेकडी येथे करण्यात आले. आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने सलग १६ तास वाचन व अभ्यास याचे नियोजन भिमटेकडी येथे करण्यात आले होते. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, प्रमुख पाहुणे एसडीओ मनोज लोणारकर, तहसिलदार तथा मंत्री महोदय याचे OSD अनिल भटकर, सहायक आयुक्त समाजकल्याण माया केदार, बौद्ध प्रचार समितीचे मा. तायडे सर व सहारे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा विजय वानखेडे, प्रकल्प अधिकारी बार्टी यांनी केले तर सुत्रसंचालन समतादूत अनिता गवई यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा मोहोड यांनी केले.
ज्येष्ठ नागरीकांचे जनजागृती शिबीर
त्याचप्रमाणे, मधुबन वृध्दाश्रमात जेष्ठ नागरीकांचे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. माजी प्राचार्य डॉ. दिलीप काळे , प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहायक आयुक्त माया केदार, दिलीप दाभाडे आदी उपस्थित होते.
आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता नेहमी आनंदी राहणे गरजेचे आहे. वृद्धांना एकाकी पडू न देणारा समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे ज्येष्ठ नागरिक हे लहान मुलांप्रमाणेच असतात हे सर्व तरुण पिढीने ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे वृद्धापकाळ ही प्रत्येकाच्या जीवनातील सेकंड इनिंग आहे. त्याकरीता छोटया छोटया गोष्टींमध्ये किंवा एखादा छंद जोपासुन त्यामध्ये रममाण व्हावे जेणे करुन इतर विचार येणार नाहीत आणि ज्यांच्या कडुन थोडे चालणे होत असेल त्यांनी वृद्वाश्रमाच्या परिसरामध्ये दररोज चालावे, निखळ हसावे आणि प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ काळे यांनी आपल्या व्याख्यानात केले. जेष्ठ नागरीकांसाठी शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.