सत्ताधारी होण्याचा संकल्प करा-मा.खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ बसपाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे थाटात उद्घाटन  

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजप सरकारमुळे देखील देशात अघोषित आणीबाणीसदृश्य स्थिती आहे.या राजकीय अस्थिरतेत बहुजन समाज पार्टी हाच सर्वसामान्यांसाठी बळकट पर्याय आहे.त्यामुळे ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या उद्दिष्ट प्राप्तीसाठी कॅडरने शिस्तबद्ध रित्या पक्षाच्या विचारधारेला शेवटच्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम करावे. याच पक्षकार्य, संघटन बांधणीच्या बळावर बसपाचा निळा झेंडा विधानसभेवर फडकवेल. सर्वांनी सत्ताधारी होण्याचा संकल्प त्यामुळे केलाच पाहिजे,असे प्रतिपादन बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी केले.
बसपाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे शनिवारी थाटात उद्घाटन पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्यात पक्षाचे मा.प्रदेश प्रभारी नितीन सिंह जाटव, मा.प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, मा.प्रदेश प्रभारी प्रा.प्रशांत इंगळे साहेब, मा.प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब, एम.सी.ई सोसायटी, पुणे चे अध्यक्ष मा.पी.ए.इनामदार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे फुले पगडी घालून आणि सावित्रीबाई फुले ही पुस्तिका देवून स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या काळात पक्षाची ताकद वाढली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी समाधानकारक राहील. राज्यात काढण्यात आलेल्या संवाद यात्रेमुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची वैचारिक भूमिका पोहचवण्यात मदत मिळाली आहे. पक्षाच्या बाजूने त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून हे श्रेय केवळ कॅडरचे आहे. राज्यात पक्षाच्या निळ्या झेंड्याला विधानसभेवर, महानगर पालिकांवर फडकवण्याची महत्वाची जबाबदारी कॅडरच्या खांद्यावर आहे, असे मत पुढे बोलतांना खा.डॉ.अशोक सिद्धार्थ साहेबांनी प्रास्ताविक करतांना व्यक्त केले.
बसपाच्या पक्षसंघटनेचा डौलारा कॅडरच्या बळावर उभा आहे.पक्षाचा कणा असलेल्या कॅडरचे प्रशिक्षण त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे. बसपाचा कॅडर पक्षाच्या विचारधारेप्रती प्रामाणिक आहे. अशात सामाजित परिवर्तनाची मशाला पेटवणार्या कॅडरचे प्रशिक्षण महत्वाचे आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त व बहुजन समाज पार्टीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त या ‘राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.राज्यभरातून हजारो कॅडर या शिबिरात उपस्थित आहेत.पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’च्या अनुषंगाने कॅडरला मार्गक्रम करण्यासाठी हे शिबिर महत्वाचे ठरेल,असा विश्वास खा.डॉ.सिद्धार्थ यांनी व्यक्त केला.
उद्घाटन समारंभात मा.अँड.संदीप ताजने (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), मा.प्रा.प्रशांत इंगळे , मा.सुनील डोंगरे (प्रभारी,महाराष्ट्र प्रदेश), मा.चेतन पवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), मा.सुदीपजी गायकवाड (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश), मा.भाऊसाहेब शिंदे (सचिव,महाराष्ट्र प्रदेश), मा.अजित ठोकळे (सचिव,महाराष्ट्र प्रदेश), मा.सुरेश दादा गायकवाड (सचिव, महाराष्ट्र प्रदेश) मा. हुलगेश भाई चलवादी(पुणे जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कॅडर उपस्थित होते.