तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

राज्यातील जि.प.शाळेच्या प्रगतीसाठी कृती आराखडा तयार

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाचा शैक्षणिक दर्जा सुधारावा,यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू असून,शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सोबतीला जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती व्हावी,यासाठी कृती आराखडा तयार असून त्याच अनुषंगाने तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रविवारी केले. त्यांनी दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट दिली,यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले,”तोंगलाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रगती ही कौतुकास्पद आहे,या शाळेचा आदर्श राज्यातील इतर शाळांनी घ्यावा,याकरिता ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल बनविणार असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष बावणेर,प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव,दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले गटशिक्षणाधिकारी वीरेंद्र तराळ,जिल्हा बँकेचे संचालक शशिकांत मंगळे,प्रहार सेवक बल्लू जवंजाळ,योगेश मानकर,ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाषराव जऊळकार,सचिव विलास यादव आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाक्रीडा अधिकारी गणेशराव जाधव,प्रा.निलेश जळमकर,प्रा.डॉ.देवलाल आठवले तसेच विद्यार्थीनी प्रितिका अनंता जऊळकार व पार्थ संतोष ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई बाबाराव कडू व जिल्हाक्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई ओंकारराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक लक्ष रुपयांची देणगी जिल्हा परिषद शाळेला देण्यात आली.

याप्रसंगी शाळेची दिव्यांग विद्यार्थिनी कु.वैष्णवी संदीप चव्हाण हिने जिल्हास्थरिय गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचा व कोविड काळात “शाळा बंद शिक्षण सुरू” हा उपक्रम यशस्वी करणारे शाळेचे ‘शिक्षकमित्र’ महिमा पानझाडे,श्वेता चौरपगार,दीपाली मानकर,राधा काळे,आश्विनी मेहरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार रायबोले व संचलन शाळेचे शिक्षणतज्ञ धनंजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका तेजस्विनी अटाळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती,विद्यार्थी,शिक्षकमित्र,ग्रामपंचायत कार्यालय व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.