चला शाळेमध्ये श्रमदान करू, शैक्षणिक समानतेची गुढी उभारू शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून गुढीपाडव्याला शाळेत श्रमदान

चला शाळेमध्ये श्रमदान करू, शैक्षणिक समानतेची गुढी उभारू
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून गुढीपाडव्याला शाळेत श्रमदान

‘चला शाळेमध्ये श्रमदान करू, शैक्षणिक समानतेची गुढी उभारू’, असा संदेश देत शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज गुढीपाडव्याला बेलोरा येथील जि. प. शाळेत श्रमदान केले व शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचे आवाहन केले.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी आज सकाळी बेलोरा येथील जि. प. शाळेत अनेक कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. राज्यमंत्र्यांनी स्वत: कुदळ फावडे हाती घेऊन अथकपणे परिश्रम करून सहभागी नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहित केले. शाळेच्या परिसरातील कचरा हटवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.

शिक्षणातील विषमता संपवणे आवश्यक आहे. समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी केली.

ते म्हणाले की, उपक्रमाद्वारे शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मी या शाळेत शिकलो. शाळेच्या स्मृती मनात कायम आहेत. माझ्या स्व. मातोश्रींच्या स्मृतीनिमित्त दोन लाख रूपये या शाळेला देऊन विविध सुविधा उभारण्यात येतील. ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा ध्यास सर्वांनी घेतला आहे. अद्ययावत शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील.

ते पुढे म्हणाले की, केवळ बेलो-यापुरते नव्हे, तर राहुटी उपक्रमाच्या धर्तीवर दर पंधरवड्याला हा उपक्रम विविध गावांतील शाळांत राबवू. दुर्लक्षित भागातील शाळांचे रूप पालटण्यात येईल. तिथे आवश्यक त्या सुविधा उभारण्याचा प्रयत्न राहील. या उपक्रमाची मुहुर्तमेढ आज गुढीपाडव्यानिमित्त करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमात अनेक कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ, युवक सहभागी झाले होते.