चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्राला वेकोलिच्‍या माध्‍यमातुन नियमित कोळसा पुरवठा करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्राला वेस्‍टर्न कोलफिल्‍डस लिमीटेडच्‍या माध्‍यमातुन अनियमीत कोळसा पुरवठा होत असल्‍यामुळे भविष्‍यात विज निर्मीतीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता सदर औष्णिक विदयुत केंद्राला आवश्‍यकतेनुसार नियमित कोळसा पुरवठा करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा मंत्री आणि वेकोलिचे सिएमडी मनोजकुमार यांचेकडे केली आहे.

 

चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्राची स्‍थापीत क्ष्‍ामता 2920 मेगावॅट इतकी आहे. या विज निर्मीती केंद्राला विज निर्मीतीसाठी 50 हजार टन कोळश्‍याची आवश्‍यकता आहे. मात्र सदयस्थितीत युटीएस, रोपवे, रोड ट्रान्‍सपोर्ट या माध्‍यमातुन भटाळी, दुर्गापूर, पद्मापूर येथील खाणींच्‍या माध्‍यमातुन 12 हजार मेट्रीक टन कोळसा नियमित उपलब्‍ध होत आहे. मात्र कोळश्‍याची रोजची मागणी 50 हजार टन असल्‍यामुळे एनबॉक्‍स तसेच डीओबीआर च्‍या माध्‍यमातुन 35 हजार टन कोळसा अपेक्षीत आहे. गेल्‍या काही महिन्‍यांपासुन वेकोलिच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्राला नियमित कोळसा पुरवठा होत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. भविष्‍यात याचा विपरित परिणाम विज निर्मीतीवर होवू शकतो. ऐन उन्‍हाळयाच्‍या कालावधीत विज निर्मीती ठप्‍प होण्‍याचे संकट यामुळे उद्भवू शकते.

चंद्रपूर महाऔष्णिक विदयुत केंद्र हे वेकोलिच्‍या खाण क्षेत्रात स्‍थापित असल्‍यामुळे वेकोलिच्‍या माध्‍यमातुन आवश्‍यकतेनुसार नियमित कोळसा पुरवठा होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्‍यामुळे याकडे प्राधान्‍याने लक्ष देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.