पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील सेलिब्रिटीं येथे भेट देत असतात. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाचे नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

 

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे . जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरपाम, सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

पालकमंत्री पुढे म्हणाले की या भागातील मोहाडी नलेश्वर येथे महिंद्रा क्लबचे वतीने 100 एकर जागेवर पर्यटकांकरिता हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे 400 नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. एका नामवंत अगरबत्ती कंपनीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे 600 महिलांना रोजगार प्राप्त होईल. तसेच गौण वनउपजावर आधारित 42 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून या सर्व कामातून जवळपास दिड हजार नागरिकांना या भागात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी सांगितले की ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र हे वनसंपदा व वन्यजीवांच्या बाबतीत ताडोबापेक्षा कमी नाही, येथील नागरिकांनी पर्यटनाचा रोजगारासाठी फायदा करुन घ्यावा.

 

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते शामा प्रसाद जनवन योजनेंतर्गत मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावाला सौर कुंपण, सौर दिवे, गावालगत साफसफाई इ. कामांसाठी 19 गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना सुमारे पाच कोटींचे धनादेश वाटप करण्यात आले. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी तसेच पिकांच्या संरक्षणासाठी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

सुरवातीला सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. कच्चेपार जंगल सफारी साठी 38 किलोमीटर ट्रॅक तयार असून या भागात वाघ, बिबट, अस्वल इ. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षीप्रेमींसाठी हे जंगल नंदनवन असुन विविध प्रकारचे पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलात दोन तलाव व तीन पाणवठे आहेत. सफारी साठी 7 वाहने मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.