पत्रकारांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर ४ एप्रिलला ४५ वर्षांवरील पत्रकार व कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लाभ • जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आयोजन

 

अमरावती

फ्रंटीअर वर्कर्स म्हणून पत्रकारांना मान्यता मिळाल्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हा तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. त्यासोबतच आता वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकार तसेच विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात कार्यरत सर्व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आरोग्य विभागाच्या सहयोगाने मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन केले आहे. रविवार ४ एप्रिल रोजी खापर्डे बगीचा परिसरातील संत गजानन महाराज मंदिरामागील शासकीय केंद्रावर एक दिवसासाठी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

राज्यात सर्वप्रथम पत्रकारांना कोरोनाची लस प्राप्त करून दिल्यानंतर आता वयाने जेष्ठ असलेले पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात कार्यरत सर्व कर्मचारी यांना मोफत लस उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या मध्ये पत्रकार, वृत्तपत्रामध्ये काम करणारे कर्मचारी, इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, न्युज पोर्टल्स, पेपर्स वाटणारे हॉकर्स यांचाही समावेश करण्यात आला आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची छायाप्रती सोबत आणणे आवश्यक असेल. या शिबीराच्या नोंदणीसाठी सरचिटणीस प्रफुल्ल घवळे (९३७०१०४२९३), अरूण जोशी (८६०५९४८८५३) प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे (९४०३३८७७५२) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ऑपरेटर्स आणि हॉकर्सचाही समावेश

वर्तमानपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडियाच्या कार्यालयात काम करणारे वयाने ४५ वर्षे पूर्ण केलेले संगणक ऑपरेटर्स, क्लार्क, चपराशी यांच्यासोबत वर्तमापत्रांचे वाटप करणारे हॉकर्स यांना देखील या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. न्यूज मिडियाशी संबंधित सर्वच कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लसीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने पुढाकार घेतला आहे