भंगाराम तळोधीत पक्षांसाठी बांधले पाणवठे अनिकेत दुर्गे यांचा पुढाकार

 

तालुका प्रतिनिधी नीकेश बोरकुटे
गोंडपिपरी:- उन्हाळा लागल्याने उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे सर्वत्र लाही- लाही होत आहे.वाढत्या उष्णतेने मनुष्यामात्रासह पक्षांचीही चांगलीच भंबेरी उडाली आहे.पाण्यासाठी पक्षी तर सर्वदूर भटकतांना दिसून पडत आहेत. पक्षांची ही पाण्यासाठीची भटकंती रोखण्यासाठी युवकांनी एकत्र येत गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे टाकाऊ वस्तूंपासून पक्षी पाणवठे तयार केले आहेत.

दिवसेंदिवस जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे आणि चोहीकडे काँक्रीटचे जंगल वाढत असल्याचे सर्वत्र चित्र दिसुन येतआहे. यामुळेच की काय पहाटेपासूनच चिमण्यांचा चिवचिवाटासह किलबिल करणारे विविध प्रजातीचे पक्षी देखील झपाट्याने कमी होत आहे. अशातच या तप्त उन्हाळ्यात तापणाऱ्या उन्हामुळे दरवर्षी पक्ष्यांवर संक्रांत येत आहे. यामुळे पक्षांचा पाण्याविना जीव जात आहे. याकरिता अनिकेत दुर्गे यांच्या पुढाकारातून गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे पक्ष्यांसाठी टाकावू वस्तूंपासून पाणवठे तयार करण्यात आले. त्यात नियमित पाणी टाकण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे.

पाणवठे तयार करण्यासाठी अनिकेत दुर्गे, अंकुश भारशंकर,आदित्य ऊराडे, आकाश भारशंकर, विपुल डोंगरे, अशोक भारशंकर, शुभम बारसागडे, आनंद ऊराडे, मनिरत्न ऊराडे, समीर बारसागडे यांनी सहकार्य केले.