प्रतिनिधी // अंकुश पूरी
गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मौजा मरकेगाव या ठिकाणी लग्न समारंभाच्या वेळी 25 पेक्षा जास्त व्यक्तींची संख्या आढळून आल्याने त्या ठिकाणी स्थानिक कृतिसमितीने लग्नसमारंभातील वधू-वरांच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच गर्दी न करण्याबाबत विविध आदेश निर्गमित केले होते. तसेच कोणत्याही लग्नसमारंभात 25 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास अटकाव घालण्यात आला होता. असे असताना देखील संबंधित ठिकाणी लग्न समारंभात दीडशेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आढळून आले व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मास्क न घालणे, शारीरिक अंतराचे पालन न करणे अशा गोष्टी आढळून आल्याने स्थानिक कृती समिती, यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व इतर समिती सदस्य यांनी संबंधित लग्नसमारंभातील वधू-वरांचे आई-वडील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानुसार पोलीस स्टेशन मधून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व जमावबंदी आदेश यानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुषगांने मौजा – मरकेगांव येथे दिनांक 17.04.2021 ला झालेल्या लग्न समारंभात जास्तीत जास्त 25 लोक उपस्थित असणे अपेक्षीत होते. परंतू गावपातळी वरील कृती समिती मधील तलाठी धानोरा व ग्रामसेवक तुकूम, सरपंच कोटवार व ग्रां.प. शिपाई यांनी केलेल्या तपासणीत अंदाजे 150 लोकांची उपस्थिती असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यामुळे वर व वधुच्या आई वडील तसेच आचारी ( केटरर्स ) यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व आणि महाराष्ट्र कोवीड -19 विनियमन 2020 चे कलम 11 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) 3 135 त्याचप्रमाणे भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 260, 271 नुसार ग्रामसेवक, ग्रा. प. तुकूम यांनी दिनांक 17.04.2021 रोजी पोलीस स्टेशन, धानोरा येथे F.I.R. दाखल केल्याचे धानोरा तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी कळविले आहे.