मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेची घोषणा केली. आजपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू असेल. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय राज्य आपत्ती मदत निधीच्या (एसडीआरएफ) माध्यमातून प्रभावित व्यक्तींना मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंनी मंगळवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केले. ‘भूकंप, अवर्षण, पूर आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाते. त्यानंतर याचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना संकटाला आपण सगळ्यांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांची उपजीविका संकटात सापडली आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जावी,’ असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याच्या वृत्ताला मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी दुजोरा दिला. ‘कोरोना संकट एक आपत्ती आहे. पण या संकटाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे या संकटाचा फटका बसलेल्यांना वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत देता येत नाही. कोरोनाला नैसर्गिक संकट घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात यावा. केंद्रानं यासंदर्भात पावलं उचलायला हवीत,’ असं कुटेंनी सांगितले.