वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार अंगीकारा:भाग्यश्री आत्राम मल्लेरा येथे पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

गडचिरोल्ली उपजिल्हा प्रतिनिधी // मारोती कोलावार

मुलचेरा:- सर्व गोंडीयन बांधवांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांचे विचार अंगीकार करा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व कोया पुनेम पंडुम कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लेखा मेंढाचे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,कोठारीचे उपसरपंच मनोज बंडावार,मुलचेरा नगरपंचायतचे बांधकाम सभापती काशिनाथ कन्नाके, मल्लेरा चे माजी उपसरपंच विलास गावडे,पोलीस पाटील देवाजी ओडेंगवार,पेसा ग्रामकोश समितीचे अध्यक्ष वसंत इष्टाम,चिन्ना पाटील कोवे,सेवानिवृत्त कर्मचारी मारोती इष्टाम,बाबुराव तोर्रेम,रमेश कुसनाके, कोठारी चे ग्रा.पं. सदस्य कालिदास कुसनाके, तालुका कृषी सहाय्यक रवी मडावी, भूमक,मल्लेरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

पुढे बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी वीर बाबुराव शेडमाके गडचिरोली क्षेत्राच्या इतिहासात आदिवासींच्या संघर्षाला अजरामर करून गौरवशाली प्रतिकार युद्धाची मांडणी करून गेले आहे व तो आजही वर्तमानातील शोषणाविरोधातील इथल्या संघर्षांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे समाजाने त्यांचा आदर्श बाळगावा असेही त्यांनी आवाहन केले.

अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी आदिवासी हाच देशाचा मूळ मालक आहे. तो वैचारिक आदर्शाचा मानबिंदू आहे. पारंपारिक संस्कृती समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, आदिवासींचा प्रत्येक कायदा हिताचा ठरविण्यासाठी, आदिवासींचे न्याय हक्क व जबाबदाऱ्या कायम ठेवण्यासाठी आदिवासी समाजाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगतानाच कायदेविषयक मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसभेने काय केले पाहिजे, वन अधिकार कायदा काय आहे, ग्रामसभेने कामकाज कसे हाताळावे, पंचायत राज म्हणजे काय ? एवढेच नव्हे तर जल,जंगल, जमिनीबाबत बोलताना त्यांनी ती आपली व्यक्तिगत प्रॉपर्टी नसून ती सामूहिक प्रॉपर्टी आहे.त्याचे जतन आपण कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षक रमेश कुसनाके यांनी थोर पुरुष,क्रांतिकारी योद्धांचे पुतळे उभारल्याने युवा पिढीला कशाप्रकारे प्रेरणा मिळते याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

*गावात रॅली काढून मान्यवरांचे केले स्वागत*
कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे गावात प्रवेश होताच ढोल, ताशांच्या गजरात रेला नृत्य सादर करून गावात रॅली काढून मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा-पाठ, पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच सप्तरंगी ध्वजारोहण करून उपस्थित शेकडो आदिवासी बांधवांना मान्यवरांनी संबोधित केले.