लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. या अभिनव कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषतः वऱ्हाडी आणि कोरकू भाषेतून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती अमरावती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.
लोककलावंतांच्या अभिनयाने दिली शासकीय योजनांना प्रसिद्धी
गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.
समर्पण बहुद्देशीय संस्था, माई मानव बहुद्देशीय संस्था तसेच गंधर्व बहुद्देशीय संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 च्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, चांदुररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. धारणी तसेच चिखलदरा या भागात कोरकु भाषेतूनही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले, हे विशेष.
ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता आमच्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात.
ग्रामस्थांनी घेतला लोककलेचा आस्वाद
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात लोककलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कोरोना निर्बंधामुळे लोककलेचे आयोजन दोन वर्षात झाले नव्हते. जिल्हा माहिती कार्यालयामुळे ग्रामस्थांनी लोककलेचा आनंद घेतला. या पारंपारिक लोककलेच्या कार्यक्रमाचे प्रथमच जिओ टँगिंगही करण्यात आले होते. कलापथकांच्या सादरीकरणाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करुन कलावंतांचे आदरतिथ्य केले.