जलसंपदा विभागातर्फे जागतिक जलदिनानिमित्त विविध विभागांच्या सहकार्याने शहरात जलदिंडी काढून जलबचतीचा संदेश देण्यात आला. शहरातील प्रमुख चौकांत पथनाट्य, आकर्षक फलक, आसमंत निनादून सोडणा-या घोषणा असे स्वरूप असलेल्या जलदिंडीत नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जलसंपदा विभागातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या सहकार्याने जलदिंडी काढण्यात आली. मालटेकडीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय परिसरात मंगळवारी सकाळी सात वाजता जलदिंडीचा आरंभ झाला. मुख्य जलसंपदा अभियंता अ. ना. बहादुरे यांनी संदेशरथाला हिरवी झेंडी दाखवून दिंडीचा शुभारंभ केला. मुख्य अभियंता (वि. प्र.) अ. ल. पाठक, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंता मेघा अक्केवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विवेक सोळंके आदी उपस्थित होते.
जलदिंडीत विविध विभागाचे अभियंते, कर्मचारी, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, युवक आदी जलबचतीचा संदेश देणा-या टोप्या घालून उत्साहाने सहभागी झाले होते. ‘वासुदेवाची ऐका वाणी, साठवून ठेवा थेंब थेंब पाणी’, ‘जल है तो कल है’, ‘आजच पाणी वाचवा, उद्याची चिंता मिटवा’ असे नामफलक हाती घेऊन दिंडीतील सहभागी मंडळींनी जलबचतीचे आवाहन करणा-या घोषणाही दिल्या.
मालटेकडीवरून जलदिंडी खापर्डे बगिचा मार्गे इर्विन चौकात पोहोचली. तिथे स्थानिक प्रतिभावंत कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी दाद दिली. पाण्याची बचत केली नाही तर तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होईल. त्यामुळे जलबचतीची सवय अंगीकारण्याचे आवाहन पथनाट्याद्वारे करण्यात आले. पंचवटी येथेही पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे अभियंताभवन येथे दिडींची सांगता झाली.
वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणामुळे पाण्याची बचत अत्यावश्यक झाली आहे. जलसंकट टाळायचे असेल तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणले पाहिजे. त्यासाठी पाण्याची बचत करणे ही सवय व्हावी. येणा-या पिढीसाठी ही कृती प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे. मुलांच्या मनावरही जलबचतीचे महत्व बिंबवले पाहिजे, असे आवाहन विविध मान्यवरांनी सांगता कार्यक्रमात केले. श्री. बहादुरे, श्री. पाठक, श्रीमती देशमुख, श्री. सोळंके आदींनी जलबचतीचे आवाहन केले.