राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार देण्यात भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

 

1122 कामावर 85 हजार 509 मजुरांना काम उपलब्ध

भंडारा, दि. 21 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात उत्तम काम सुरू आहे. 1 हजार 122 कामावर 85 हजार 509 अपेक्षित मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. राज्यात रोजगार देण्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत साकोली, तुमसर, लाखनी व मोहाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर उपस्थिती आहे. रोजगार निर्मितीचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुका आणि गावकरी यंत्रणा जोमाने काम करत आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, यासाठी यासाठी नरेगाची यंत्रणा कार्यरत आहे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जिल्ह्यात एकूण 2 लक्ष 72 हजार 340 कुटुंबांनी नोंदणी केली आहे. पैकी 1 लक्ष 62 हजार 422 कुटुंबांनी कामासाठी मागणी नोंदवली आहे. यामध्ये 2 लक्ष 31 हजार 757 मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 1 हजार 122 कामे सुरू आहेत. प्रतिदिन 85 हजार 509 अपेक्षित मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे .
तालुकानिहाय सुरू असलेली कामे : भंडारा तालुक्यात 221 कामांवर 5 हजार 345 मजूर उपस्थिती, लाखांदूर मध्ये 138 कामांवर 8 हजार 613 मजूर उपस्थिती, लाखनी 153 कामांवर 15 हजार 657 मजूर उपस्थिती, मोहाडी 151 कामांवर 19 हजार 657 मजूर उपस्थिती, पवनी 136 कामांवर 7 हजार 417 मजूर उपस्थिती, साकोली 103 कामांवर 15 हजार 544 मजूर उपस्थिती, तुमसर 220 कामांवर 13 हजार 276 मजूर उपस्थिती असून एकूण 1 हजार 122 कामांवर 85 हजार 509 मजूर उपस्थिती असल्याचे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक नूतन सावंत यांनी कळविले आहे.