जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधायुक्त असावे पालकमंत्री सुनील केदार

तालुका प्रतिनिधी //धीरज कसारे

नारा येथील प्रा.आ.केंद्राचे उद्घाटन

केंद्रावर 6 कोटी 64 लाखाचा खर्च

परिसरातील 23 गावांना होणार लाभ

कारंजा (घा.): प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम होत असतांना केवळ ईमारत बांधून उपयोग नाही. इमारतीसोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, पाण्याची पुरेशी व्यवस्था, सर्व वैद्यकीय उपकरणे, आवश्यक कर्मचारी वर्ग अशा सर्वच गोष्टींचा त्यात अंतर्भाव असावा. नारा येथील केंद्राचे बांधकाम अतिशय सुंदर झाले आहे. याच पध्दतीने सर्व बाबींचा अंतर्भाव असलेले केंद्र निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
कारंजा तालुक्यातील नारा येथे 6 कोटी 64 लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे होत्या तर आ.दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मृणाल माटे, सदस्य निता गजाम, रेवताताई धोटे, सुरेश खवसी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, पं.स.उपसभापती जगदीश डोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, कार्यकारी अभियंता विवेक पेंढे, तहसिलदार ऐश्वर्या गिरी आदी उपस्थित होते.
आरोग्य केंद्र बांधकामाचे प्रस्ताव होत असतांना त्यात सर्व बाबींचा समावेश आहेत किंवा नाही हे तपासून यापुढे प्रस्ताव मंजुर केले जावे, अशा सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला केल्या. आरोग्य केंद्रासाठी औषधांची कमतरता नाही, पुरेशी औषधी उपलब्ध होतील, याची दक्षता घेतली जावी. येथे येणाऱ्या नागरीकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यामुळे केंद्रासाठी अतिरिक्त पाणी पुरठ्याची कामे करावी लागत असल्यास तसे प्रस्तावित करावे. वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सोलर पॅनल प्रस्तावित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. कोरोना काळात आशा, अंगणवाडी सेविकांनी उत्कृष्ट काम केले. या काळात आपण कर्मचाऱ्यांचे वेतन थांबू दिले नाही. विकासाच्या योजना बंद झाल्या नाहीत. कठीण काळातही विकास सातत्याने होत राहिला, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिप अध्यक्षा सरिता गाखरे यांनी आरोग्य केंद्रात सर्व सुविधा मिळाल्या तरच केंद्राचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. पक्षपात विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे सांगितले. आ.केचे यांनी यांचे देखील यावेळी भाषण झाले. विकासाची अनेक कामे परिसरात मंजुर झाल्याचे ते म्हणाले. सीईओ डॅा.ओम्बासे व जिप सदस्य निता गजाम यांचीही भाषणे झाली.
सुरुवातीस फित कापून व नामफलकाचे अनावरण करून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पाच आरोग्य उपकेंद्र आहेत. पाच ग्रामपंचायती आणि त्या अंतर्गत 23 गावातील नागरीकांना या केंद्राचा लाभ होणार आहे. केंद्रासाठी 79 प्रकारचे वैद्यकीय साहित्य बजाज फाऊंडेशनच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.रा.ज.पराडकर यांनी केले तर आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.नाईक यांनी मानले.

शंभर टक्के लसिकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव
आपल्या गावाचे जलदगतीने शंभर टक्के कोरोना लसिकरण करणाऱ्या कारंजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. त्यात तालुक्यातील नागाझरी, धानोली व मेटहिरजी या गावांचा समावेश आहे. गावातील सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री केदार यांनी पाच लक्ष रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिस व शाल श्रीफळ देऊन त्यांचे कौतूक केले.