गडचिरोली जिल्ह्यात होळी, धुलीवंदन साधेपणाने साजरा करा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

 

अहेरी तालुका प्रतिनिधी इरफान शेख

 

गडचिरोली,दि.26  महाराष्ट्र राज्यात सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याअनुषंगाने दि. 08 मार्च 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये मा. मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन आदेश निर्गमित केले आहेत. दिनांक 28 मार्च 2021 रोजी होळी व दिनांक 29 मार्च 2021 रोजी धुलीवंदन उत्सव होत असून सदर उत्सव कार्यक्रमात नागरीक मोठया प्रमाणात एकत्रीत येऊन गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोविड-19 संबंधात वेळोवेळी शासनाने करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणार नाही. त्याअनुषंगाने होळी, धुलीवंदन सण कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे. सदरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थान अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला यांनी कळविले आहे.