ज्‍युबिली हायस्‍कुलचे नूतनीकरण व वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियम या विकासकामांच्‍या निविदा आठ दिवसात प्रकाशित कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी पूरातत्‍व विभागासाठी नवी दिल्‍लीत लवकरच बैठक घेणार

 

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

ज्‍युबिली हायस्‍कुल चंद्रपूरचे नूतनीकरण, वीर बाबुराव शेडमाके इनडोअर स्‍टेडियमचे बांधकाम या विकासकामांच्‍या निविदा येत्‍या आठ दिवसात प्रसिध्‍द करुन अंतिम करण्‍याच्‍या सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना दिल्‍या. महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासा संदर्भात पूरातत्‍व विभागाच्‍या परवानगीसाठी येत्‍या पंधरा दिवसात नवी दिल्‍लीत केंद्रीय सांस्‍कृतिक कार्यमंत्र्यांसह बैठक घेवून तोडगा काढण्‍यात येईल असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. माझ्या मंत्रीपदाच्‍या कार्यकाळात मंजुर ही विकासकामे माझ्या दृष्‍टीने अतिशय महत्‍वापूर्ण व जिव्‍हाळयाची आहेत, ती आपण पूर्णत्‍वास नेणारच असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

वरील मंजुर विकासकामांचा आढावा घेण्‍याच्‍या दृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार श्रीमती सुषमा सारखरवाडे अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर यांच्‍यासह बैठक घेतली.

श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराचे सौंदर्यीकरणासाठी अंदाजे ६० कोटी रु. निधी दि. १९ सप्टे. २०१९ रोजी मंजुर झाला असुन स्‍थापत्‍य अंदाजपत्रकास तांत्रीक मान्‍यता प्राप्‍त आहे. पुरातत्‍व विभागाच्‍या परवानगीसाठी प्रस्‍ताव फेर सादर करण्‍यात आला असल्‍याची माहीती अधिक्षक अभियंता यांनी दिली.

ज्‍युबिली हायस्‍कुलचे नूतनीकरण व वीर बाबुराव शेडमाके स्‍टेडियम तयार करणे या विकासकामांसाठी दि. १९ सप्‍टें. २०१९ रोजी अनुक्रमे ९ कोटी व २५ कोटी रु. निधी मंजुर झाला असुन निविदा प्रकाशनाची कार्यवाही सुरु असल्‍याचेही अधिक्षक अभियंता यांनी सांगीतले.

श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या सौंदर्यीकरणासाठी जो फेर प्रस्‍ताव पुरातत्‍व विभागाच्‍या परवानगीसाठी सादर करण्‍यात आला आहे, त्‍याबाबत येत्‍या पंधरा दिवसात नवी दिल्‍ली येथे केंद्रीय सांस्‍कृतिक कार्य मंत्र्यांसह बैठक घेवून तोडगा काढण्‍यात येईल असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले.