कोरपना तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावा खासदार बाळू धानोरकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना गडचांदूर येथे विविध शासकीय विभागाची आढावा बैठक

 

राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

कोरपना – गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात खासदार बाळू धानोरकर यांनी आज (दि.४ ला) आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरपना तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आरोग्य विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते. एक-एक करून सर्व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित नागरिकांना सुद्धा समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार नागरिकांच्या ज्या-ज्या समस्या आहे त्या त्वरित सोडून अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच जिल्हास्तरावर वेगवेगळ्या विभागाला ज्या प्रशासकीय अडचणी आहे त्यासुद्धा नोंदविण्यात आल्या. कोरोनाचे लसीकरण तात्काळ सुरू करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा व सवलती गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, संवर्ग विकास अधिकारी बबनराव पाचपाटील, ठाणेदार गोपाल भारती नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, अरुण निमजे, विजय बावणे, सुरेश मालेकर, श्याम रणदिवे, पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे, आशिष देरकर, माधव जीवतोडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.