हिंगणघाट ई-फेरफार निकाली काढण्यात राज्यात अव्वल

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

फेरफार निकाली काढण्याचे प्रमाण 99.90 टक्के

जिल्ह्यात फेरफारचा सेवा हमी कायद्यात समावेश

हिंगणघाटमध्ये 51 हजारावर ई-फेरफार निकाली

वर्धा, दि.18: राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत नागरिकांना तातडीने फेरफार उपलब्ध व्हावेत यासाठी ई-फेरफार प्रणाली राबविण्यात येत आहे. ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असलेल्या या कामात हिंगणघाट तालुक्याने राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. हिंगणघाटने 99.90 टक्के फेरफार अर्ज निकाली काढले असून कामाची राज्यातील ही सर्वाधिक गती आहे.
नागरिकांना कमी त्रासात, कमी वेळेत आणि कमी खर्चात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुण दिल्या आहेत. नागरिकांच्या मालमत्तेचे फेरफार ही अतिशय महत्वाची बाब आहे. ही सेवा कमी वेळेत आणि त्रासात उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार उपक्रम राबविण्यात येते. त्यासाठी शासनाने एक ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे.
लोकसेवा हमी कायद्यांतर्गत सेवेच्या उपलब्धतेवर कालमर्यादेचे बंधन आले आहे. जिल्ह्यातील महसुलच्या अधिकाधिक सेवा या कायद्यांतर्गत आणून नागरिकांना सेवा देण्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे धोरण आहे. त्यामुळे त्यांनी महसुलच्या तब्बल 90 सेवांचा या कायद्यात समावेश केला आहे. ई-फेरफारचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 15 दिवसात ई-फेरफार उपलब्ध करून देणे कायद्याने बंधणकारक झाले आहे.
हिंगणघाट तालुक्याने सेवाहमी कायद्यांतर्गत ई-फेरफारमध्ये अतुलनिय कामगिरी केली आहे. ई-फेरफार प्रणालीमध्ये दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंदणी सादर होतात. सदर दस्त सादर झाल्यानंतर तलाठी ऑनलाईन फेरफार घेतात. त्यानंतर 15 दिवसाच्या आत फेरफार मंजुर केला जातो. हिंगणघाट तालुक्यात विहीत मुदतीत व सर्वात कमी कालावधीमध्ये फेरफार निकाली काढले जात आहे.
हिंगणघाट तालुक्यात अनोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे 37 हजार 734 इतक्या नोंदी घेण्यात आल्या आहे. नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे 13 हजार 434 नोंदी विहीत मुदतीत प्रमाणित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. फेरफार निकाली काढण्याची तालुक्याची आकडेवारी 99.90 टक्के असून ती राज्यात सर्वाधिक आहे. यासाठी तहसिलदरांसह महसुलचे तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे.
फेरफार नोंदणी वेळीच होणे आवश्यक – प्रेरणा देशभ्रतार
नागरिकांच्या मालमत्तेचे वेळीच फेरफार होणे आवश्यक आहे. फेरफार नोंदी वेळेत आणि व्यवस्थित न झाल्यास पुढे मालमत्ताविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे जिल्ह्यात फेरफार या बाबींचा लोकसेवा हक्क कायद्यात समावेश करण्यात आला आहे. फेरफार जलदगतीने निकाली काढण्यासाठी आपण प्रत्येक महिण्याच्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित करतो.
फेरफार मुदतीत निकाली काढण्याला प्राधान्य – तहसिलदार सतिश मासाळ
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे फेरफार निकाली काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. यापुढेही फेरफार मुदतीत निकाली काढले जातील. नागरिकांना ई-हक्क प्रणाली मधून सुध्दा फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. त्याचा सुध्दा नागरिकांनी लाभ घ्यावा.