फेरफार अदालतीमध्ये 559 प्रकरणे निकाली जिल्हाधिकारी संजय मीणा यांची मूलचेरा येथील अदालतीला भेट

 

गडचिरोली: शासनाच्या महत्वकांक्षी महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हयात फेरफार अदालतींचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर फेरफार अदालतींमध्ये फेरफार नोंदी प्रमाणीत करून लाभार्त्यांना अद्यावत 7/12, अभिलेखे, गाव नमुना 8-अ उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हयात विवादग्रस्त 10 फेरफार, 549 साधे फेरफार असे मिळून 559 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये सर्वांत जास्त गडचिरोली तालुक्यातील 181 प्रकरणांचा समावेश आहे. त्यानंतर चामोर्शी 101 प्रकरणे, देसाईगंज तालुक्यात 80 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. उर्वरीत तालुक्यांमध्ये धानोरा 14, मुलचेरा 6, आरमोरी 62, कुरखेडा 20, कोरची 6, अहेरी 54, एटापल्ली निरंक, भामरागड 8 व सिरोंचा 27 प्रकरणांचा समावेश आहे.

मूलचेरा येथे जिल्हाधिकारी संजय मीणा यांची उपस्थिती
मुलचेरा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. फेरफार अदालत कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. तसेच यावेळी सुवर्णा येमुलवार, सभापती, पंचायत समिती मूलचेरा, राबिन शहा सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, कपिल हाटकर तहसीलदार मूलचेरा हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. सदर फेरफार अदालतीच्या कार्यक्रमात 6 फेरफार नोंदी प्रमाणीत करून लाभार्त्यांना अद्यावत 7/12, अभिलेखे, गाव नमुना 8-अ उपलब्ध करून देण्यात आला. त्याचबरोबर रेंगेवाही येथील 9 वनहक्क धारक शेतकरी यांना अनुसूची जे प्रमाणपत्र व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे धनादेश तसेच मौजा वेंगणूर येथील सामुहिक वनहक्क दाव्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संजय मीणा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी फेरफार अदालतीचे महत्त्व तसेच सामूहिक वनहक्क व रोजगार हमी योजनेबद्दल माहिती उपस्थित शेतकरी, वनहक्क धारक यांना दिली. वनहक्कांच्या माध्यमातून आधुनिक शेती करून वनहक्क धारक शेतकरी यांनी आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले. फेरफार अदालत कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय प्रमुख, सरपंच, शेतकरी बांधव, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रितेश चिंदमवार तलाठी लगाम यांनी केले तर प्रास्ताविक सर्वेश मेश्राम नायब तहसिलदार यांनी केले.