मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस केला विकलांग मुलासोबत साजरा

 

 

ठाणे शहरातील बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र असलेल्या स्वयम या संस्थेत जाऊन महाराष्ट्र राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला. यासमयी या संस्थेतील विशेष मुलांसोबत केक कापून त्यांना आनंदाने भरवला तसेच त्यांना खाऊ आणि भेटवस्तूही दिल्या.

गेली १६ वर्षे कार्यरत असलेल्या स्वयम या संस्थेच्या भरारी आत्मविश्वासाची या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेसोबतच मान्यवर तज्ज्ञांनी या मुलांचं पालकत्व कसं निभावून न्यावं याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या पाच सीडींच्या संचाचे देखील प्रकाशन केले. या माध्यमातून जी मुले कोणत्याही संस्थेत अथवा शाळेत विशेष मुलांना दाखल करू शकत नाहीत त्यांना या मुलांना कसे हाताळावे त्याच्याशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे काम सोपे नाही. या कामासाठी अत्यंत चिकाटी आणि समर्पणाची भावना लागते. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांची काळजी घेणाऱ्या स्वयम संस्थेला लागेल ती मदत करण्याची तयारी याप्रसंगी दर्शवली.

यासमयी खासदार राजन विचारे, स्वयम संस्थेचे संचालक नीता व राजीव देवळाणकर, या शाळेतील मुलांचे पालक, शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते.