दिशाभूल करणारी आयुर्वेदिक औषधे अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

वर्धा, दि.4 अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुबंई येथील गुप्तावार्ता विभागास दिशाभूल करणारा मजकूर असलेली आयुर्वेदिक औषधे नागपूर वर्धा मार्गावर विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली. या आधारे औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) नागपूर व औषध निरीक्षक वर्धाच्या पथकाने कारवाई करुन विविध कंपनीची 15 हजार 800 रुपयांची आयुर्वेदिक औषधे जप्त केली.
नागपूर – वर्धा मार्गावरील खडकी येथील हॉटेल रॉयल फूड येथे विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधी विक्रीस प्रदर्शित करण्यात आली होती. सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी भेट देऊन Badal Pain Oil, Diabates Care Curna, Pachak Methi या औषधीचे मे मानस आयुर्वेदिक फार्मसी , गाझीयाबाद उत्तरप्रदेश मार्फत उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले. सदर औषधीवर दिशाभूल करण्याचा मजकूर तसेच या उत्पादनाबाबत दिशाभूल करणारा मजकूर असलेली जाहिरात प्रदर्शित केली असल्याचे आढळून आले. यामुळे सदर कंपनीची औषधे जप्त करण्यात आली.
औषधी उत्पादनावर असलेला मजकूर औषधे जादुटोना उपाय (आक्षेपार्ह जाहिरात ) कायदा 1954 मधील कलम 3 व 4 तरतुदीचे उल्लघन होत असल्याच्या कारणाने औषधे जप्त करण्यात आली. सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह, सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या मार्गदर्शनात औषध निरिक्षक (गुप्तवार्ता) निरज लोहकरे, सतिश चौव्हाण यांनी केली.
नागरिकांनी दिशाभूल करणारे दावे असणारे औषधे खरेदी करु नये, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावा तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने यांच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्हा कार्यालय तसेच 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परीमल सिंह यांनी केले आहे.