बातमी संकलक // उमंग शुक्ला
अमरावती, दि.31 : केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेत हंगाम 2022 च्या शेतमाल तूर हमी भाव खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला.
अमरावती कृउबासचे सभापती विजय दहिकर, सचिव दीपक विजयकर, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन होऊन तूर खरेदीचा शुभारंभ झाला.
पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकरी बांधव, हमाल, कष्टकरी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधव व कष्टक-यांसाठी अनेक उत्तमोत्तम बाबींची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. त्यानुसार प्रस्ताव द्यावेत. आवश्यकतेनुसार शेड व इतर सुविधा आदी बाबींची पूर्तता करून घ्यावी.
यंदा तुरीचा हमीभाव सहा हजार 300 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश करावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.