ब्रम्हपूरी येथे मुर्तीचे अनावरण व विविध विकास कामांचे भुमिपूजन
चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : तथागत गौतम बुध्द यांनी जगाला प्रेम, करूणा, शांती, मानवी मुल्ये आणि अहिंसेचा विचार दिला आहे. आजही तथागतांच्या या विचारांची गरज असून मानवी जीवनासाठी त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपूरी येथील देलनवाडी, शांती नगर येथे असलेल्या विहारात गौतम बुध्दांच्या मुर्तीचे अनावरण करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मारोतराव कांबळे तर प्रमुख उपस्थितांमध्ये ब्रम्हपूरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, डॉ. एस. के. गजभिये, डॉ. देवेश कांबळे, प्राध्यापक राजेश कांबळे, डॉ. भारत गणवीर, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, विलास विखार, सम्यक महिला मंडळाच्या अध्यक्षा करूणा बोदेले, हर्षा नगराळे आदी उपस्थित होते.
तथागतांच्या मुर्तीचे अनावरण करतांना अतिशय आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, गौतम बुध्दांच्या विचारांची देशाला आज नितांत गरज आहे. अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करण्याची प्रेरणा तथागतांच्या विचारातून मिळते. मूर्ती अतिशय तेजोमय असून त्याची भव्यता आणि दिव्यता मुर्तीकडे पाहिल्यावर येते. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारून शोषित, पिडीत, दलितांसाठी संपूर्ण आयुष्य झिजविले. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेण्याची गरज आहे.
विहार हे केवळ पुजेचे स्थान नाही तर विचारातून समाज घडविण्याचे ते एक केंद्र आहे. डॉ. बाबासाहेबांनी नेहमी पुस्तकांना जपले. त्यामुळे या विहाराच्या बाजूला मोकळ्या जागेत पुस्तकांचे दालन तयार करावे. मुलांना घडविण्यासाठी पुस्तकांची नितांत गरज आहे. ज्ञानाची आणि पुस्तकांची भूक असली की पोटाची भूक भागवता येते. त्यामुळे येथील वाचनालयासाठी निधी देण्यात येईल. तसेच या परिसराच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामांचे झाले भुमिपूजन : वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या बाजुला जलतरण तलावाचे (स्विमींग पुल) बांधकाम करणे, उद्यान विकसित करून सुशोभीकरण करणे (9 कोटी 50 लक्ष रुपये) तसेच विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.
यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ब्रम्हपुरी शहरातील प्रभाग क्र. 5 मध्ये विविध ठिकाणी सिमेंट रस्ते, नाल्या बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (40 लक्ष रुपये), प्रभाग क्र.6 मध्ये स्वागत मंगल कार्यालयाच्या मागे विविध ठिकाणी सिमेंट रस्ते, नाल्या बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (47 लक्ष रुपये), प्रभाग क्र.7 मध्ये ग्रामीण रुग्णालयाजवळ विविध ठिकाणी नाली बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (1 कोटी 8 लक्ष), प्रभाग क्र. 8 मध्ये गुरुदेव नगर हनुमान मंदिर जवळ विविध ठिकाणी नाली बांधकाम करणे (39 लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे.
यावेळी नगरसेवक डॉ नितीन उराडे, महेश भर्रे, हितेंद्र राऊत, प्रितीश बुरले, नगरसेविका सुनीता तिडके, नगरसेविका वनीता अलगदेवे, निलीमा सावरकर, मंगला लोनबले, योगिता आमले, मुन्ना रामटेके आदी उपस्थित होते.