सेवा सुरळीत करा अन्यथा येत्या ७ जानेवारी ला बँकेला ताला ठोकू

एटापल्ली : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत इंटरनेट सेवा सुरळीत राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी व कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा ७ जानेवारी २०२१ रोजी बँक शाखेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघटना एटापल्लीच्या वतीने देण्यात आला आहे.

येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत इंटरनेटची सुव्यवस्था व कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, बँक प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, शाखेतील कामकाजाची गती मंदावली असून याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात २१ नोव्हेंबर २०२० रोजी निवेदन

देऊन दहा दिवसात समस्यांची सोडवणूक

करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, निवेदन देऊन तब्बल महिनाभराचा कालावधी लोटूनही या विनंतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ७ जानेवारी २०२१ रोजी बँकेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लूरवार, सचिन मोतकुरवार,संदीप सेलवटकर, सुरेश बारसागडे, शरिफ शेख, यांनी दिला आहे. सदर निवेदन बँकेचे शाखा व्यवस्थापक, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.